आंनदेश्वर, लासुर, अमरावती सध्या माझा मुक्काम माहेरी दर्यापूरला आहे, बऱ्याच दिवसांनी इकडे आल्यामुळे माहेरपण पुरेपूर उपभोगत आहे हे वेगळं सांगायला नकोच! नुकतीच कुटुंबासह लासुरला भेट दिली. वयाची ३६ वर्षं उलटली तरी अगदी गावाजवळ असलेल्या या मंदिरात जाण्याचा योग काही आला नाही! दर्यापूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर लासुर नावाचे खेडेगाव आहे, ते प्रसिद्ध आहे एका विशेष बाबी साठी, ती म्हणजे इथे असलेले आंनदेश्वर शिव मंदिर! दर्यापूर-अकोला मार्गावर असलेल्या लासुर गावात स्थित असलेल्या या मंदिरापर्यंत थेट जायला सुस्थितीतला सिमेंटचा रस्ता आहे ज्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे शिवमंदिर आहे तब्बल ८०० वर्षं जुनं, १२ व्या शतकात बांधलेलं! पुरातन पण खूप सुंदर! बऱ्यापैकी उंचावर वसलेल्या या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने जरा डोकावून नजर फिरवली की सगळीकडे हिरवागार दिसतं.. झाडं.. आणि खाली पसरलेलं कुरण.. त्यात चरत असलेल्या गायी..वर पसरलेले मळभ दाटून आलेलं...
आपला विदर्भ आपला अभिमान !!