सध्या माझा मुक्काम माहेरी दर्यापूरला आहे, बऱ्याच दिवसांनी इकडे आल्यामुळे माहेरपण पुरेपूर उपभोगत आहे हे वेगळं सांगायला नकोच! नुकतीच कुटुंबासह लासुरला भेट दिली. वयाची ३६ वर्षं उलटली तरी अगदी गावाजवळ असलेल्या या मंदिरात जाण्याचा योग काही आला नाही!
दर्यापूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर लासुर नावाचे खेडेगाव आहे, ते प्रसिद्ध आहे एका विशेष बाबी साठी, ती म्हणजे इथे असलेले आंनदेश्वर शिव मंदिर! दर्यापूर-अकोला मार्गावर असलेल्या लासुर गावात स्थित असलेल्या या मंदिरापर्यंत थेट जायला सुस्थितीतला सिमेंटचा रस्ता आहे ज्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे शिवमंदिर आहे तब्बल ८०० वर्षं जुनं, १२ व्या शतकात बांधलेलं! पुरातन पण खूप सुंदर!
बऱ्यापैकी उंचावर वसलेल्या या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने जरा डोकावून नजर फिरवली की सगळीकडे हिरवागार दिसतं.. झाडं.. आणि खाली पसरलेलं कुरण.. त्यात चरत असलेल्या गायी..वर पसरलेले मळभ दाटून आलेलं आभाळ.. फार छान देखावा!
लोखंडी फाटक ओलांडून आत गेलं उजव्या हाताला आहे पिंपळ! मस्त पसरलेला.. हिरवागार...वाऱ्यावर मनसोक्त झुलणारा...झाडाभोवती पार बांधलेला..पाराशी निवांत बसलेली गावातली एक-दोन जुनी खोडं…अंगात बंडी-धोतर..सोबत पाण्याची जुनाट बाटली आणि काठी...डोक्यात असंख्य विचार असलेली..विचारांची मालिका तोडत कुणी पाहुणा बोलला तर मात्र आपल्या गावरान भाषेत संवाद साधणारी! असो!
तर,वळूया मंदीराकडे.. संपुर्ण दगडी बांधकाम, मोठमोठ्या शिळांवर अतिशय कलात्मकरित्या रचलेलं हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. कोणार्कच्या
सुर्यमंदिराशी मेळ खाणारं हे मंदिर फारच सुंदर दिसतं!
दगडी पायऱ्या चढून वर गेलं आत प्रशस्त सभामंडप आहे, विशेष म्हणजे या मंदिराला कळस नाही,गोलाकार छताचा भाग संपूर्ण मोकळा, त्या छतातून दिसणारं निळं आकाश आणि चालणारा उनसावल्यांचा खेळ.. सगळंच अचंबित करणारं..या न बांधलेल्या छताबद्दल अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे की हे मंदिर दैत्यांनी एका रात्रीत बांधलेय,सकाळ होताच हे दैत्य पळून गेले, छताचा भाग बांधायचा राहून गेला तो गेलाच... कायमचा!
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या दगडी शिळांनी हे मंदिर बांधलाय त्या प्रकारचा दगड आसपासच्या जवळपास २०० किलोमीटर परिघात सापडत नाही,त्यामुळे एवढे प्रचंड दगड या परिसरात आणले कसे? हा खरं तर एक संशोधनाचा विषय आहे!
संपुर्ण मंदिर हे सभामंडपातल्या १२ खांब आणि भिंतीतल्या ६ अशा एकूण १८ दगडी खांबांनी तोलून धरले आहे, प्रत्येक खांब खूप सुंदर, कोरीवकाम असलेला, भितींवर, अगदी छतावर देखिल नक्षीकाम कोरले आहे! छिन्नी-हातोड्या सारख्या आयुधांनी इतकं सुंदर शिल्प कोरणं म्हणजे खरंच कमाल!
हे मंदिर त्रिदल आहे,म्हणजे तीन गाभाऱ्यांनी बनलेले,प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला दोन उप गाभारे आणि समोर एक मुख्य गाभारा असे तीन गाभारे नजरेस पडतात. डावीकडच्या गाभाऱ्यात मंदिर परिसरात सापडलेल्या काही मुर्त्या ठेवल्या आहेत तर उजवीकडच्या गाभाऱ्यात पूर्वी एक विहीर होती म्हणतात, त्यातून तळघरात जाण्यासाठी एक छुपा रस्ता होता, आता ती विहीर बुजवलेली दिसते..तसेच हा गाभारा कुलूपबंद होता.
मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी बाहेर दाराशी डाव्या उजव्या बाजूला दोन यक्षमूर्ती आहेत...आतमध्ये प्राचीन शिवलिंग आहे,श्रावण महिना सुरू असल्याने भाविक मोठया श्रद्धेने या जागृत आंनदेश्वराची पूजा करत होते...बेलपत्री आणि फुलं वाहिलेली काळीशार पिंड मोठी सुरेख दिसत होती बरं!तुरळक गर्दी असल्याने निवांत दर्शन करता आले.. चित्त प्रसन्न झालं दर्शन घेऊन!
मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायला बऱ्यापैकी रुंद दगडी चौथरा आहे, तसेच खाली उतरून देखिल प्रदक्षिणा मारता येते,त्यासाठी सिमेंटची पाऊलवाट बनवली आहे, अर्थात अलीकडे बनवली असावी.
बाहेरून देखील मंदिराची सुबकता ठायी ठायी जाणवते, विशिष्ट रचनेत मांडलेले दगड लक्ष वेधून घेतात.बाहेरच्या बाजूने सुद्धा कोरीवकाम आहे,पाना फुलांची नक्षी,कोरलेले गायक नर्तक वादक या सोबतच नरसिंह अवतार आणि कृष्णासह गोपिका यांच्या मूर्ती फारच मोहक दिसतात. काही नक्षीकाम काळाच्या ओघात भंगलेले आढळते.
वरुन बघितल्यास हे मंदिर स्वस्तिकच्या आकाराचे आहे असे दिसतं.. एका प्रचंड रथाला हत्ती जोडलाय असा देखील आभास होतो.
असे म्हणतात बऱ्याच वर्षांअगोदर हे संपूर्ण मंदिर जमिनीच्या आत गडप झाले होते, हळूहळू मंदिराचा छताकडचा भाग वर येऊ लागला, जमिनीतून हे विहिरी सारखे काय वर यायला लागले? याचा गावकऱ्यांनी शोध घेतला, ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केली, उत्खननात हे लक्षवेधी मंदिर बाहेर आले.
या मंदिराची काळाच्या गरजेनुसार वेळोवेळी डागडुजी करण्यात आली, गरज पडेल तिथे सिमेंट लावून दगड सांधण्यात आले.पुरातत्व विभागाने ती जबाबदारी नीट पार पाडली,हे दिसूनच येते.
मंदिराच्या आवारात बसण्यासाठी लोखंडी बेंचेस आहेत, त्यांचे प्लॅस्टिकचे आवरण देखील अजून निघाले नव्हते,नुकतेच लावले असावेत. मंदिराचा परिसर देखील स्वछ आहे, देखभाल कोण करत असावं ते कळलं नाही कारण मी गेले तेव्हा आतमध्ये मंदिरात देखील कोणी पुजारी दिसला नाही. मंदिरात ना दानपेटी आहे ना देणगी देण्यासाठी पावती फाडण्याची व्यवस्था. पण एकूण मंदिराचे सुरळित चाललेले कामकाज बघता गावकऱ्यांनी सामायिकरित्या जबाबदारी उचललेली दिसते.
प्रदक्षिणेच्या रस्त्यावर भिंतीला टेकून एक म्हातारे बाबा बसलेले दिसले, बऱ्याच वेळपासून तसेच बसले असावेत, कुठे तंद्री लागली होती कुणास ठाऊक?इतके निश्चल की मंदिराचाच एक अविभाज्य भाग असावेत.असो!
हे हरवलेलं मंदिर आता हळूहळू माणसांना सापडायला लागलंय,पूर्वी इंटरनेटवर फारशी माहिती उपलब्ध नव्हती पण आजकाल काही हौशी मुलांनी आणि इतिहासाची आवड असलेल्यांनी केलेले व्हिडीओज आणि डॉक्युमेंटरी यु ट्यूब वर उपलब्ध आहेत. आम्ही तिथे असताना तिथे आलेला एक माणूस गुगलवर मंदिराबद्दल वाचूनच मंदिर शोधत आला होता.
१९५८च्या पुरातत्त्व स्मारकासंबंधीच्या अधिनियमानुसार हे मंदिर एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.मंदिराला कुठल्याही प्रकारची बाधा पोहचवल्यास शिक्षापात्र गुन्हा नोंदवण्यात येऊ शकतो आणि दंडसुध्दा आकारण्यात येऊ शकतो, तसा सुचनावजा फलक फाटकाबाहेर लावण्यात आला आहे.
या परिसरात फोटोज तर इतके सुंदर येतात की अकोल्याच्या एका साडीच्या ब्रॅण्डने आपल्या जाहिरातीसाठी इथे फोटोशूट देखील केले आहे.आम्ही सुद्धा अर्थातच भरपूर फोटो काढले..घरापासून अवघ्या एका तासात येणं-जाणं होतं..एक ऐतिहासिक वास्तू बघायला मिळते.. आणि एक सुंदर अनुभव गाठीशी जमा होतो!
तर मंडळी, अमरावती-अकोला भागात आलात तर नक्की या आंनदेश्वर मंदिराला भेट द्या..रोडलगतच हे लासुर गाव आहे..उत्तम रस्ता आहे थेट मंदिरापर्यंत..भेटीचा पुरेपूर आनंद आणि समाधान लाभणार याची १००% खात्री बाळगा!
✍ विनया मगरे-सहस्त्रबुद्धे.
(Photo - Devashish Shah)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा