#VidarbhaDarshan - सुफी संत दादा हयात कलंदर दर्गा, मंगरूळपीर, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी एक मंगरूळ पीर. ‘मंगलपूर’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘मंगरूळ’ हे नाव तयार झाल्याचे सांगितले जाते. या शहराच्या नावाला ‘पीर’ हा शब्द लागण्याचे कारण म्हणजे येथील सुप्रसिद्ध पीराचा दर्गा. या शहरातील विविधधर्मांच्या लोकांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत.
मला येथील सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे दरवर्षी होणारी जत्रा. ही जत्रा दहा दिवस चालते. या जत्रेत मोठमोठाले पाळणे, विविध वस्तूंची दुकाने तसेच खाद्यपदार्थांचे गाडे असतात. टुरिंग टॉकीजेस तसेच खेळांची दुकानेदेखील असतात. सर्कशीसारख्या थरारक गोष्टी असतात. प्रत्येकाने एकदातरी ही जत्रा अनुभवावी असे मला वाटते.
हे शहर एक आध्यात्मिक भूमी आहे. या शहरातील पीराचा दर्गा हा सुफी संत दादा हयात कलंदर यांचा आहे. जगात जे तीन कलंदर होऊन गेले त्यांपैकी हे एक. विंध्य ओलांडून येणारी ही पहिली मुस्लीम व्यक्ती. खुद्द औरंगजेबाने या दर्ग्याला देणगी दिल्याची नोंद आहे.हा दर्गा म्हणजे अतिशय सुंदर व प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच या शहरात ब्रिटिशांच्या काळात श्री बिरबलनाथ महाराज हे संतपुरूष होऊन गेले. त्यांनी येथे नाथ संप्रदायाचा प्रसार केला. येथेच त्यांनी जिवंत समाधी घेतली. शहराच्या मध्यभागी त्यांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्यावरील श्रध्देपोटी शहराला ‘मंगरूळनाथ’ असेही म्हटले जाते. येथे दरवर्षी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जत्रा आयोजित केली जाते. या आध्यात्मिक स्थळांना भेट दिल्यावर आपल्याला एका वेगळ्याच उर्जेचा अनुभव येतो.
शहरामध्ये एक मोठा तलाव आहे जो पावसाळ्यामध्ये पाहणार्यांचे लक्ष वेधून घेतो. शहराच्या आतील भागात दाट लोकवस्ती असली तरी शहराच्या आजूबाजूंनी अनेक झाडे आहेत. शहराचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक मोकळी मैदाने आहेत. ही मोकळी मैदाने म्हणजे मुलांचे सर्वात आवडीची ठिकाणे. कारण इथेच मुलांचा शारीरिक विकास होतो. असे हे शहर नक्कीच भेट देण्यासारखे आहे.
— मंदार कुळकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा