आंनदेश्वर, लासुर, अमरावती सध्या माझा मुक्काम माहेरी दर्यापूरला आहे, बऱ्याच दिवसांनी इकडे आल्यामुळे माहेरपण पुरेपूर उपभोगत आहे हे वेगळं सांगायला नकोच! नुकतीच कुटुंबासह लासुरला भेट दिली. वयाची ३६ वर्षं उलटली तरी अगदी गावाजवळ असलेल्या या मंदिरात जाण्याचा योग काही आला नाही! दर्यापूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर लासुर नावाचे खेडेगाव आहे, ते प्रसिद्ध आहे एका विशेष बाबी साठी, ती म्हणजे इथे असलेले आंनदेश्वर शिव मंदिर! दर्यापूर-अकोला मार्गावर असलेल्या लासुर गावात स्थित असलेल्या या मंदिरापर्यंत थेट जायला सुस्थितीतला सिमेंटचा रस्ता आहे ज्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे शिवमंदिर आहे तब्बल ८०० वर्षं जुनं, १२ व्या शतकात बांधलेलं! पुरातन पण खूप सुंदर! बऱ्यापैकी उंचावर वसलेल्या या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने जरा डोकावून नजर फिरवली की सगळीकडे हिरवागार दिसतं.. झाडं.. आणि खाली पसरलेलं कुरण.. त्यात चरत असलेल्या गायी..वर पसरलेले मळभ दाटून आलेलं...
#VidarbhaDarshan - मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली ऐतिहासिक पायविहिर, जयपूर, बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यातील जयपूर हे छोटं ऐतिहासिक गाव. मिर्झा राजे जयसिंग विदर्भ दौर्यावर असताना काही काळ जयपूर येथे वास्तव्यास होते. त्यांनी येथे पायरी विहीर आणि छत्री बांधली. छत्री सध्या अस्तित्वात नाही. पण विहीर मात्र अजून तग धरुन जयसिंगांची साक्ष म्हणून आहे. ही पुरातन विहीर अष्टकोणी आहे. विहीरीचा खालील भाग दगडात बांधलेला आहे. आणि वरील भाग जुन्या काळातील चपट्या विटांनी बांधलेला आहे. विहीरीच्या आत खोल्या आहेत. विहीरीत उतरण्यासाठी दोन बाजूंनी पायर्या आहेत. विहीर अजून सुस्थितीत आहे, साफसफाई आणि डागडुजी केल्यास सुंदरता वाढेल. जयपूर हे ऐतिहासिक गाव आहे. येथे मिर्झा राजे जयसिंगांच्या खाणाखुणा सापडतात. गावाच्या पुर्व दिशेला सुर्य मंदिर आहे. विहीर परिसरात तीन प्राचीन समाधी होत्या, त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. आधी जयपूर आणि कोथळी एकच गाव होते. जयपूर हे नाव जयसिंग यांच्या नावावरुनच ठेवले गेले आहे. जवळच गोसिंग गाव आहे त्या गावाचा संबंध सुध्दा जयसिंगाशी असावा. जयसिंगांचे मुळ ग...